- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनानिमित्त एम.एस.स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन(एमएसएसआरएफ)व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने धानोरा येथे आयोजित जनजागृती कार्यक्रमात करण्यात आले.
यावेळी महिला शेतकरी प्रमाणपत्राचे महत्त्व,शेतीतील महिलांच्या योगदानाची अधिकृत नोंद आणि शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी प्रमाणपत्राची उपयुक्तता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रमाणपत्रासंदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी उपस्थित महिला शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.
महिला शेतकरी प्रमाणपत्रधारक महिलांनाही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ विहित अटी व निकषांनुसार मिळू शकतो,अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी दिली.जिल्ह्यातील पात्र महिलांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा,असे त्यांनी सांगितले.
एमएसएसआरएफच्या वरिष्ठ संशोधक डॉ.आर.व्ही. भवानी यांनी महिला शेतकऱ्यांपर्यंत प्रमाणपत्राविषयीची माहिती पोहोचविण्याची आवश्यकता व्यक्त केली. अधिकाधिक महिलांना प्रमाणपत्र मिळावे,यासाठी यापुढेही जनजागृती बैठका आयोजित करण्यात येतील,असे त्यांनी सांगितले.
महिला शेतकरी सक्षमीकरण कायद्यांतर्गत २ ऑक्टोंबरपासून महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे.जमीन स्वतःच्या नावावर नसली तरी शेती व संबंधित व्यवसायांमध्ये कार्यरत पात्र महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणे हा प्रमाणपत्राचा उद्देश असल्याचे एवढे सांगण्यात आले.पीक लागवड,कृषी मजुरी,पशुपालन, कुक्कुटपालन,मत्स्यपालन,कृषिवनीकरण,गांडूळखत निर्मिती,मशरूम उत्पादन आणि कृषी उत्पादनांवरील प्राथमिक प्रक्रिया आदी क्षेत्रांतील महिलांचा यामध्ये समावेश असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
तसेच,१५ ऑक्टोंबरपर्यंत राज्यात महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ५० लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून,३ लाख ४३ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत.गडचिरोली जिल्ह्यात ९० हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून,२ हजार १९५ हून अधिक प्रमाणपत्रे देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीस तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण सरोवदे, गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राचे प्रमुख स्वप्नील घिर्डे,महिला आर्थिक विकास महामंडळाच्या समुदाय व्यवस्थापित संसाधन केंद्राच्या व्यवस्थापक रसिका मारगाये,कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर झाडे,एमएसएसआरएफचे कार्यक्रम समन्वयक महेश मस्के,प्रकल्प सहयोगी दर्शिता तुमाने, जनसंपर्क प्रमुख ज्योती शेलार तसेच कृषी विभाग, माविम व उमेदचे अधिकारी आणि महिला शेतकरी उपस्थित होते.
- Advertisement -

