- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-दुष्काळग्रस्त गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांतील पात्र कुटुंबांना नियमित मोफत अन्नधान्याचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.शेतीवर अवलंबून असणारे शेतकरी,शेतमजूर आणि गरजू नागरिकांना अन्नधान्याची टंचाई भासू नये,यासाठी नवीन पात्र लाभार्थ्यांचा योजनेत समावेश,स्थलांतरितांना अन्य ठिकाणी धान्य घेण्याची सुविधा आणि वेळेवर वितरणावर भर देण्यात येत आहे.
राज्यात जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत पर्जन्यमानातील तूट व अन्य घटकांमुळे प्रभावित झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये खरीप २०२६ हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ अंतर्गत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आणि चामोर्शी या दोन तालुक्यांचा समावेश आहे.या पार्श्वभूमीवर अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ९ ऑक्टोंबर २०२६ च्या शासन निर्णयानुसार जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात कार्यवाही करण्यात येत आहे.
जिल्हा पुरवठा विभागाच्या माहितीनुसार,राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम,२०१३ अंतर्गत जिल्हाभरात सध्या अंत्योदय अन्न योजनेतील १ लाख २ हजार ९०८ शिधापत्रिकांवर दरमहा प्रति शिधापत्रिका ३५ किलो मोफत अन्नधान्य वितरित केले जात आहे.तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील ४ लाख ७३ हजार ९८० लाभार्थ्यांना दरमहा प्रति व्यक्ती ५ किलो मोफत अन्नधान्य दिले जात आहे.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या नियमित लाभाचे वितरण विनाविलंब व्हावे आणि एकही पात्र कुटुंब अन्नधान्यापासून वंचित राहू नये,यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.
रोजगार अथवा पाण्याच्या शोधात स्थलांतर करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ अंतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ घेता येणार आहे.या सुविधेमुळे लाभार्थ्यांना ई-पॉस यंत्राद्वारे जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील जवळच्या रास्तभाव दुकानातून त्यांच्या हक्काचे मोफत अन्नधान्य मिळवता येईल. त्यामुळे स्थलांतर झाल्यानंतरही धान्याचा लाभ घेता येणार आहे.
दुष्काळग्रस्त भागातील ज्या गरजू नागरिकांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत अद्याप समावेश झालेला नाही, त्यांनी संबंधित तालुका पुरवठा शाखा किंवा तहसील कार्यालयाकडे समावेशासाठी मागणी करावी.त्यांची पात्रता तपासून,नियमानुसार योजनेतील मंजूर लाभार्थी संख्येच्या उपलब्ध मर्यादेत अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंब योजनेत समावेशाची कार्यवाही करण्यात येईल.शिधापत्रिकेशी आधार क्रमांक जोडण्याची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून संबंधित पात्र लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध करून दिले जाईल.
‘मिशन सुधार’ अंतर्गत यापूर्वी रद्द झालेल्या शिधापत्रिकांमुळे उपलब्ध झालेल्या मर्यादेत दुष्काळग्रस्त भागातील नवीन पात्र लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.या माध्यमातून योजनेबाहेर असलेल्या गरजू पात्र कुटुंबांना अन्नधान्याचा लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात येत आहे.
धान्याची उचल आणि रास्तभाव दुकानांमधून वाटप वेळेत पूर्ण होण्यासाठी आगाऊ व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच धान्याचा काळाबाजार व अवैध साठेबाजी रोखण्यासाठी पुरवठा विभागाची नियंत्रण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळण्यात अडचण येत असल्यास किंवा वितरणाबाबत तक्रार असल्यास संबंधित रास्तभाव दुकानदार,तालुका पुरवठा शाखा किंवा तहसील कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा. योजनेत समाविष्ट नसलेल्या गरजू नागरिकांनी पात्रतेनुसार समावेशासाठी संबंधित कार्यालयाकडे मागणी करावी,असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मनोज डहारे यांनी केले आहे.
- Advertisement -

