उद्रेक न्युज वृत्त
पुणे (नगर) :- देशभरातील आरोग्य यंत्रणेला खडबडून जागे करणाऱ्या एच ३ एन २ इन्फ्लुएन्झाचा (विषाणूज्वर ) महाराष्ट्रातील पहिला मृत्यू नगरमध्ये नोंदवला गेला.एमबीबीएसचे शिक्षण घेणारा २३ वर्षीय तरुण देशातील चौथा बळी ठरला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेला हा तरुण गेल्या आठवड्यात ट्रीपसाठी कोकणात गेला होता.तेथून येताच तो आजारी पडला.त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.खासगी रुग्णालया उपचार सुरू असतानाच एच ३ एन २ इन्फ्लुएन्झाची टेस्टदेखील पॉझिटिव्ह आली.रेमडेसिवीरसोबत आवश्यक ते डोस सुरू असतानाच सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.या तरुणाच्या संपर्कात आलेल्या १९ विद्यर्थ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून वैद्यकिय महाविद्यालयात मास्क सक्ती करण्यात आली आहे.हरियाणा आणि कर्नाटकात दोन बळी गेल्यानंतर महाराष्ट्रातही एच ३ एन २ इन्फ्लुएन्झाचा बळी गेला आणि मंगळवारी गुजरातमध्येही याच तापाने महिलेचा बळी घेतला.
लहान मुलांमध्ये सध्या एच३एन२ विषाणूचा संसर्ग वाढताना दिसत आहे.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या आकडेवारीनुसार,१ जानेवारी ते १० मार्च २०२३ दरम्यान तपासलेल्या २५२९ नमुन्यांपैकी १६.९ टक्के म्हणजे ४२८ रुग्ण इन्फ्लूएंझा-ए पॉझिटिव्ह आढळले.६ रुग्ण एच१एन१ पॉझिटिव्ह तर ३९ रुग्ण इन्फ्लूएंझा बी आणि ३५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.