- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरच्या काही रजिस्ट्री ऑफिस कार्यालयात झोलझाल कारभार सुरू झाला असून रजिस्ट्री करतांना सर्वसामान्य नागरिकांकडून पैश्याची मागणी करण्यात येते.तर दस्त नियमित नसतांनादेखील रजिस्ट्री लावल्या जातात,अशा तक्रारी मंत्री बावनकुळे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या.सदर तक्रारींची दखल घेत सोमवार ६ ऑक्टोंबर २०२५ रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्यांनी नागपूर शहर क्रमांक-४ च्या कोतवालनगर येथील गुलाब अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील सहदुय्यम निबंधक वर्ग-२ या कार्यालयात अचानकपणे धाड टाकली होती. त्यांच्यासोबत काही पत्रकार आणि कॅमेरे घेऊन काहीजण होते.मंत्र्यांनी कार्यालयातील कामकाजाची पाहणी करतांना एका अधिकाऱ्याच्या टेबलाजवळ संशयास्पद हालचाली दिसल्याने त्यांनी सहदुय्यम निबंधक अनिल कपले यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली.कपले यांच्या टेबलवरील ड्रावरला कुलूप लागले होते.त्याची चाबी देण्यास अगोदर टाळाटाळ करण्यात आली.त्यानंतर ते ड्रॉवर उघडल्यावर त्यात काही रोख रक्कम आढळली.त्याचप्रमाणे रजिस्ट्रीच्या प्रक्रियेत देखील काही प्रमाणात अनियमितता आढळून आली. महसूलमंत्र्यांनी याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली.त्यानंतर काही वेळातच राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याचे पथक कार्यालयात पोहोचले.मंत्री बावनकुळे तेथून निघाल्यानंतर पोलिसांकडून रोख रक्कम कुठून आली याची विचारणा सुरू होती.रजिस्ट्रीचे सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होत असतांना तेथे रोख व्यवहारांना स्थानच नाही.तरीदेखील ड्रॉवरमध्ये रोख रक्कम आढळल्याने ते पैसे अधिकाऱ्याचे स्वतःचे होते की आणखी कुठून आले? याची चौकशी करण्यात आली. त्यानुसार मंत्र्यांनी भेट दिलेल्या कार्यालयात भ्रष्टाचाराचे पुरावे आढळल्याने सहदुय्यम निबंधक अनिल कपले यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाचे आदेश लागू असतांना अनिल कपले यांचे मुख्यालय अमरावती विभागीय कार्यालयात ठेवण्यात आले आहे.तसेच,त्यांना सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.महसूल मंत्री बावनकुळे यांनी आज गुरुवारी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट इशारा दिला की,सरकार कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार सहन करणार नाही. नागरिकांच्या हक्काच्या सेवांसाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल,असे ते म्हणाले.कारवाईमुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
- Advertisement -

