उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- तीन दिवसांपूर्वी अहेरी तालुक्याच्या छल्लेवाडा गावातील चरणदास गजानन चांदेकर वय ४८ वर्षे,रा.छल्लेवाडा यांना मध्यरात्री घराबाहेर अंगणात झोपलेल्या खाटेवर अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र,काही शरीर जळाल्यानंतर जवळच असलेल्या कुटुंबीयांनी आग विझवली.घटनेत चरणदास गंभीर जखमी झाले असून; त्यांच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.सदर घटने प्रकरणी रेपनपल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.तक्रार दाखल होताच रेपनपल्ली पोलिसांनी गांभीर्याने तपास करीत अवघ्या २४ तासात आरोपीला काल,सोमवारी अटक केली.हरिदास मुंजमकर वय ४६ वर्षे,रा.छल्लेवाडा असे आरोपीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की,आरोपी हरिदास मुंजमकर हा डीजे आणि मंडपाचा व्यवसाय करीत होता.अशा स्थितीत चरणदास चांदेकर यांनीही याच गावात डीजे आणि मंडपाचा व्यवसाय सुरू केला.गावातच स्पर्धक निर्माण झाल्याने हरिदासच्या व्यवसायातील आवक कमी झाली.याच व्यावसायिक स्पर्धेतून संतापलेल्या हरिदासने चरणदास चांदेकर यांच्या हत्येचा कट रचला. शनिवारी, १ जून रोजी रात्री चरणदास घराच्या अंगणात झोपले असताना त्यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न हरिदासने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यानुसार आरोपीला अटक करून आज,मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

