उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- उत्पन्नाचा स्त्रोत नसलेल्या पत्नी व अपत्यांचे पालनपोषण करणे पतीची जबाबदारी आहे.पती या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही.असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.तसेच,पतीने पत्नी व अल्पवयीन मुलीच्या पोटगीविरुद्ध दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.
न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. प्रकरणातील पती गोंदिया,तर पत्नी नागपूर येथील रहिवासी आहे.२३ मे २०१३ रोजी कुटुंब न्यायालयाने पत्नीला दोन हजार तर मुलीला एक हजार रुपये मासिक पोटगी मंजूर केली.त्यावर पतीचा आक्षेप होता.या दाम्पत्याने प्रेमविवाह केला होता.
या विवाहाला पतीच्या आईचा विरोध होता.त्यामुळे पत्नीचा शारीरिक-मानसिक छळ केला जात होता, तिला मारहाण केली जात होती.परिणामी,पत्नी मुलीला घेऊन माहेरी निघून गेली.त्यानंतर तिने पोटगीसाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती.पती वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. तसेच,वाहणे भाड्याने देऊनही आर्थिक उत्पन्न मिळवितो.सासू मुख्याध्यापिका आहे.करिता, पोटगी देण्याची मागणी पत्नीने केली होती.ती मागणी मान्य करण्यात आली.