उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- नागरिकांना आता घरबसल्या ऑनलाइनद्वारे ई- शिधापत्रिका काढता येणार आहे.राज्यशासनाने या निर्णयाची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.कुणालाही नाममात्र शुल्कात ई- शिधापत्रिका मिळणार आहे. त्यामुळे आता शिधापत्रिका गहाळ झाली,फाटली तरी काळजी करावी लागणार नाही.
प्रत्येक कुटुंबाची ओळख असणारी शिधापत्रिका (रेशनकार्ड) हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्याचा उपयोग धान्य मिळविण्यासाठी होत असतो.परंतु, ही शिधापत्रिका जीर्ण झाली की फाटते,गहाळ होते किंवा अनेकदा ती सोबत बाळगावी लागते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते.यासाठी राज्य शासनाने ई- शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे.
संगणक चालक माहितीची पडताळणी करेल.निरीक्षक माहितीची सत्यता तपासणार आणि पुरवठा अधिकारी सर्व कागदपत्रे पाहून ई-शिधापत्रिका नागरिकांना देणार आहे.त्यासाठी कुटुंबातील सदस्यांचे आधारकार्ड,कुटुंबप्रमुखाच्या बँकेच्या पासबुकची प्रत आणि छायाचित्र लागणार आहे.
शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये (पीसीएमएस) ई-शिधापत्रिका मिळू शकणार आहे.नागरिकांनी अर्ज केल्यास १५ दिवसांत तपासणी करून ई-शिधापत्रिका देण्यात येईल.नागरिकांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तीन टप्प्यांत त्याची तपासणी होईल.
अंत्योदय योजना २ रुपये, प्राधान्य कुटुंब योजना ५० रुपये,एपीएल शेतकरी ५० रुपये एपीएल शुभ्रसाठी १०० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे.