- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपुरात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्यांतर्गत दुहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.पोटच्या मुलाने स्वतःच्या आई-वडिलांचीच निर्घुणपणे हत्या करीत घटनेनंतर त्याने पोलीस आणि नातेवाईकांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.आई-वडिलांची हत्या नाही तर आत्महत्या असल्याचा सुरुवातीला त्याने बनाव केला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली.

नात्याला काळिमा फासणारी घटना नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खसाळा परिसरात घडली.लिलाधर डाखोळे आणि अरुणा डाखोळे असे आई-वडिलांचे नाव असून आरोपी मुलाचे नाव उत्कर्ष डाखोळे आहे.लिलाधर हे खापरखेडा येथे महाजेनकोमध्ये टेक्निशियन म्हणून काम करतात तर अरुणा विनोबा भावे नगर येथील एका खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षिका होत्या.आरोपी उत्कर्ष हा ६ वर्षांपासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता.मात्र,वारंवार नापास होत असल्याने उत्कर्षच्या कानशिलात लगावली होती.तर दोघेही त्याला अभ्यास सोडून शेती कर असे म्हणायचे.पण उत्कर्ष अभियांत्रिकी पूर्ण करण्याच्या त्याच्या निर्णयावर ठाम होता.उत्कर्षला एमडीचे(नशा येणारे द्रव्य) व्यसन होते.या व्यसनामुळे त्याला अभ्यास करता आला नाही.आई-वडिलांच्या सततच्या बोलण्यामुळे तो चिडला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या आई-वडिलांची हत्या करण्याचा निर्णय घेतला.
उत्कर्षने २६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी त्याची लहान बहीण सेजल हिला कॉलेजला सोडले.सेजल वर्धा रोडवर असलेल्या महाविद्यालयात बीएएमएसचे शिक्षण घेते.तिला कॉलेजमध्ये सोडल्यानंतर उत्कर्ष त्याच्या घरी पोहोचला,तिथे १ वाजण्याच्या सुमारास त्याने सर्वप्रथम त्याची आई अरुणा हिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर आरोपी उत्कर्ष आपल्या वडिलांची घरी येण्याची वाट पाहू लागला.सायंकाळी वडील आपल्या ड्युटीवरून घरी पोहोचल्यावर त्याने लगेचच वडिलांवर धारदार चाकूने वार करून त्यांचीही हत्या केली.या हत्येच्या घटनेनंतर आरोपीने घराला कुलूप लावून वडिलांची गाडी आणि मोबाईल फोन कोराडी येथे राहणाऱ्या त्याच्या काकाकडे गेला.तेथून त्याने आपल्या बहिणीला फोन केला आणि त्यांचे आई-वडील काही दिवस मेडिटेशनसाठी बेंगळुरूला गेले असून तेथे त्यांना मोबाइल बंद ठेवावे लागणार असल्याची खोटी माहिती दिली.
हत्येचे रहस्य उघड होऊ नये म्हणून त्याने आपल्या बहिणीला वडिलांच्या गाडीतून कॉलेजमध्ये नेऊन सोडण्यास सुरुवात केली.मात्र,दिखावा करण्यासाठी उत्कर्ष मंगळवारी रात्री त्यांच्या घरी आला आणि त्याने जोरात दरवाजा ठोठावण्याचा बहाणा केला.त्यानंतर तो पुन्हा काकांकडे गेला.हा प्रकार उघडकीस येणार म्हणून त्याने वडिलांच्या मोबाइलवर ‘सुसाईड नोट’ टाईप केली.त्याचा स्क्रिन शॉट घेत तो फोटो वडिलांच्या मोबाइलचा स्किन सेव्हर म्हणून त्याने ठेवला. ‘आमच्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नसून,त्यासाठी मुलांना त्रास देऊ नका,आमच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणीसुद्धा करू नका,आम्हाला थेट स्मशानात न्या,’ असे त्याने या नोटमध्ये लिहून ठेवले होते.दोघांचे मृतदेह कुजल्याने त्यांचा वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.
तपासादरम्यानच हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता,त्याने आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. आपण आईचा गळा दाबून व वडिलांवर चाकूने हल्ला करीत त्यांची हत्या केल्याचे त्याने मान्य केले.आपण इतके चिडलो होतो की वडिलांवर चाकूने नेमके किती वार केले हे आपल्याला आठवत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी उत्कर्षला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
- Advertisement -