उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील राज्याचा पूर्व टोक असलेल्या चांदसूरज गावापासून छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे.जवळच असलेल्या बोरतलाव येथे छत्तीसगड पोलिसांची चौकी आहे. नक्षलभाग असल्यामुळे छत्तीसगड पोलिस सतर्क असतात.रात्रभर ड्युटी करून रात्रीचा त्राण झटकण्यासाठी बोरतलाव चौकीचे तीन पोलिस जवान महाराष्ट्रातील चांदसुरज येथील ढाब्यावर चहा पिण्याकरिता गेले.चहा पिऊन परत जाताना रस्त्याच्या कडेला थांबले.सकाळी साडेआठची वेळ असल्याने आणि जवळच आले असल्याने त्यांनी सोबत शस्त्र नेले नव्हते.दरम्यान रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांना पोलिस जवान दिसताच त्यांनी बेधुंद गोळीबार करणे सुरू केले.पोलिस जवानांना काही कळण्याच्या आतच त्यांना बंदुकीच्या गोळ्या शरीर छेदून गेल्या.यात राजेश प्रतापसिंग आणि ललीत यादव या दोन पोलिस जवानांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.तर जखमी अवस्थेत एक जवान तिथून जीव वाचवून पळाला.नक्षल्यांनी हत्या केल्यानंतर त्यांच्या दुचाकीला देखील आग लावली.सीमावर्ती भागातील चळवळ संपुष्टात आल्याची अपेक्षा व्यक्त करत असतानाच ही घटना घडल्यामुळे नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.पोलिस जवानांची थोडीशी बेपर्वाई त्यांच्या जीवावर बेतली आहे.
महामार्गापासून २० फुटांवरील घटना
चांदसूरज हे गाव महाराष्ट्रात तर बोरतलाव हे गाव छत्तीसगड राज्यात आहे.दोन्ही गावांतील अंतर एक ते दीड किलोमीटर,बोरतलाव येथे चांगले दुकान नसल्याने तिनही जवान चांदसुरज नजीक असलेल्या ढाब्यावर सकाळी चहा पिण्याकरिता गेले होते.हा मार्ग दोन राज्यांना जोडणारा पक्का रस्ता आहे.रस्त्याच्या कडेला उभे राहून तिन्ही जवान बोलत असतांना आणि रहदारी सुरू असतांनाच रस्त्यापासून अगदी २० फूट अंतरावरच ही घटना घडली.त्यामुळे नक्षलवादी आधीच दबा धरून बसले होते.की त्यांना त्याची माहिती कुणीतरी पुरविली, हे तपासाअंती समोर येणार आहे.