- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा सुरू असून बारावीच्या विद्यार्थ्यांचा माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषयाचा पेपर तर दहावीच्या विद्यार्थ्यांचेही दोन पेपर बाकी आहेत.परीक्षा ही येत्या १७ मार्च रोजी संपणार आहे.तत्पूर्वी,ज्या विषयांचे पेपर झाले आहेत,अश्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत व्हावी,यासाठी दररोज शाळेच्या वेळेत विषय शिक्षकाने किमान ३५ उत्तरपत्रिका तपासाव्यात,असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.दुसरीकडे उत्तरपत्रिका तपासणीवर नेहमीप्रमाणे शिक्षक संघटनांचा बहिष्कार नसल्याने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल १५ मेपूर्वीच जाहीर होतील,अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची ११ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची २१ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू आहेत.परीक्षा नेहमीपेक्षा १० दिवस अगोदर सुरू झाल्याने निकाल देखील १५ मेपूर्वीच जाहीर केला जाणार आहे.त्याअनुषंगाने नागपूर,अमरावती, नाशिक,लातूर,पुणे,छत्रपती संभाजीनगर,मुंबई, कोल्हापूर व कोकण या विभागीय मंडळांकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा दररोज बोर्डाचे अधिकारी आढावा घेत आहेत.
औदुंबर उकिरडे,विभागीय सचिव,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे👇
बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका घरी न घेऊन जाता शाळेच्या वेळेत त्या शाळेतच तपासणे अपेक्षित आहे. उत्तरपत्रिका घरी नेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चौकशीअंती संबंधित शिक्षकासह शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई केली जाते.दरम्यान, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरपत्रिकांची तपासणी गतीने सुरू असून दोन्ही इयत्तांचे निकाल १५ मेपर्यंत जाहीर होतील,असे नियोजन आहे.
- Advertisement -