उद्रेक न्युज वृत्त :-अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.ट्रम्प यांच्या उजव्या कानाजवळ गोळी लागल्याचा त्यांनी दावा केला आहे.मात्र, गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने घटनास्थळावरून बाहेर काढले.सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्याला अमेरिकेच्या पोलीस प्रशासनातील स्नाइपरने एका घराच्या टेरेसवर बसून मारले आहे.
पेनसिल्व्हेनियातील बटलरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची निवडणूक रॅली सुरु होती.यादरम्यान ते स्टेजवर बोलत होते,तेव्हा गोळ्यांचा आवाज ऐकू आला.गोळीच्या आवाजाने ट्रम्प एकाएकी स्टेजवर पडले आणि खळबळ उडाली.या गोंधळादरम्यान ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी त्यांना ताबडतोब घेरले आणि मंचावरून खाली उतरवले.यावेळी ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर आणि कानावर रक्त वाहत होते.
हल्लेखोराचे नाव थॉमस मॅथ्यू क्रुक्स असे आहे.हा २० वर्षीय तरुण बेथखेल पार्क पेन्सिल्वेनियाचा राहणारा होता.घटनास्थळावरुन एक एआर-१५ सेमी ऑटोमॅटिक रायफलही जप्त करण्यात आली आहे.याच रायफलने ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्याची शक्यता आहे.या गोळीबाराला उत्तर देताना काऊंटर स्नायपर्सची गोळी थेट हल्लेखोराच्या डोक्यात लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

