उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली:- गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या साखरा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच यांना सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात रमाई घरकूल योजनेअंतर्गत घरकूल मंजूर झाले.त्यावेळेस विद्यमान सरपंच यांनी ग्रामपंचायत सदस्य असणारी त्यांची
पत्नी व पंचायत समितीचे घरकूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने घरकुलाचे बांधकाम न करता दुसऱ्या लाभार्थ्याचे घरासमोर उभे राहून फोटो घेत शासकीय अनुदानाची उचल केली आहे. ही बाब साखरा गावातील ग्रामस्थांनी पंचायत समिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.मात्र प्रशासन स्तरावरून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे या संदर्भात तुलाराम अंबादे, लोमेश भानारकर, प्रभाकर मेश्राम, हिवराज उंदीरवाडे यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी कणसे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.त्यामुळे साखरा येथील घरकुल प्रकरणाची सखोल चौकशी होणार असून यात कोणती कारवाई होते; याकडे साखरा ग्रामवासीयांचे लक्ष लागले आहे.