उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी अवैध दारू तस्करीविरोधात कंबर कसली आहे.याअंतर्गत जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात नाकांबदी करून परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी केली जात आहे.याच अनुषंगांतर्गत काल,शनिवारी दिनांक-३० मार्च रोजी चंद्रपूर जिल्ह्यातून होणारी दारू तस्करी रोखित डीबी पथकाने कारसह दुचाकी वाहन,असा एकूण १२ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.शहर पोलिसांनी दारू विक्रेत्यांविरोधात राबविलेल्या धडक मोहिमेमुळे दारू तस्करांसह विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
काल,शनिवारी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातून चारचाकी वाहनाने शहरात चिल्लर विक्रेत्यांना दारू पोहचविण्यात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली.या माहितीच्या आधारे डीबी पथकाने चंद्रपूर मार्गावरील आयटीआय ते गोकुळनगर मार्गावर सापळा रचला.यादरम्यान दारू तस्करी करीत असलेली कार व दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आल्या.या कारवाईत पोलिसांनी ३ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या देशी दारूसह ९ लाख १० हजार रुपये किंमतीची एक कार, दोन दुचाकी आदी वाहने जप्त केली.या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.मंगेश वासुदेव लोणारकर वय २९ वर्षे रा.फुले वॉर्ड,असे अटकेतील आरोपीचे नाव असून
फरार आरोपींमध्ये सोनु सुधाकर मोहूर्ले,दिनेश गिरीधर मोहूलें दोघेही रा.फुले वार्ड व प्रफुल अशोक दरडे रा. राखी (गुरवळा) यांचा समावेश आहे.सदर कारवाई ठाणेदार अरूण फेगडे यांचे नेतृत्वत डीबी पथकाचे धनंजय चौधरी,अविनाश लंजे,वृषाली चव्हाण यांनी पार पाडली.
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचिरोली शहरात कारने दारूची वाहतूक करण्याकरिता तस्करांनी पायलट वाहने म्हणून दोन दुचाकींचा वापर केला होता.मात्र डीबी पथकाच्या कारवाईमुळे तस्करांची योजना फसली. दारू तस्करी प्रकरणात पोलिसांनी एम.एच.३३ एई-८५४६ व एम.एच.३३ एएफ-११२० या क्रमांकाच्या दुचाकीसह ०६ जेएम- ८८७३ क्रमांकाची चारचाकी अशी तीन वाहने जप्त केली.दारू तस्करीत फरार असलेल्या आरोपींचा गडचिरोली पोलिस प्रशासनातर्फे शोध सुरू आहे.

