- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जलसंधारण सप्ताहाच्या समारोपानिमित्त आज शुक्रवारी गडचिरोली शहरात आयोजित ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ला नागरिक,युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इंदिरा गांधी चौकातून सुरू झालेल्या या वॉकेथॉनला आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला.पोटेगाव येथील जिल्हा स्टेडियममध्ये वॉकेथॉनचा समारोप झाला.
१५ ते २१ ऑगस्ट या कालावधीत आयोजित जलसंधारण सप्ताहाच्या अनुषंगाने मृद व जलसंधारण विभागातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नगराध्यक्षा प्रणिती निंबोरकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार,मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश कोठेकर,जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद घाडगे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे,यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी यावेळी पाण्याचे नियोजन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंग,तुषार सिंचन आदी जलसंधारणाच्या उपाययोजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.गडचिरोली जिल्हा सुजलाम्-सुफलाम् ठेवण्यासाठी प्रत्येकाने छोट्या-छोट्या कृतींतून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा संकल्प करावा,असे आवाहन त्यांनी केले.
नगराध्यक्षा प्रणिती निंबोरकर यांनीही भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच पाण्याचे संवर्धन व योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त केली. ‘पाणी अडवा,पाणी जिरवा’ ही संकल्पना लोकचळवळ बनवून प्रत्येकाने जलसंवर्धनात योगदान द्यावे,असे त्यांनी सांगितले.
जलसंधारण विषयावरील रिल्स तयार करून पाठविण्यासाठी आता ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मृद व जलसंधारण विभागाने केले आहे.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी महा वॉकेथॉनमध्ये सहभागी युवक-युवतींमधून लकी ड्रॉद्वारे निवड झालेल्या सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
- Advertisement -

