उद्रेक न्युज वृत्त
कोरची :- गडचिरोलीजिल्ह्यातील कोरची शहरातील तहसिल मुख्यालयाकडे जाणाऱ्या २०० ते ३०० मीटर डांबरी रस्त्याची पुरती वाट लागली असल्याने सर्वसामान्य नागरिक,दुचाकीस्वार,चारचाकी वाहन व इतर वाहनधारकांना कमालीचा त्रास व वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत असूनही याकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे.
कोरची तालुका अतिदुर्गम,नक्षलग्रस्त व मागासवर्गीयांचा तालुका म्हणून गणला जातो. तालुक्यात अनेक शासकीय कार्यालये असून यातील अनेक अधिकारी,कर्मचारी वर्ग मुख्यालयी राहत नसल्याने अनेक समस्यांच्या विळख्यात कोरची शहर व ग्रामीण भाग सापडला आहे.अशातच थातूरमातूर कामांची भर पडल्याने कंत्रादारांची चांदी तर सर्वसामान्य नागरिकांची वांदी; असे चित्र निर्माण झाले आहे.त्यामुळेच ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ होत असूनही संबंधित विभागाचे अधिकारी,कर्मचारी निद्रावस्थेत गेले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लाखोंचे काम केले जाते; मात्र काही कालावधीतच पुरती वाट लागत असल्याने रस्ता की खड्डा,पैश्याचा अड्डा असे म्हणणे वावगे ठरणार नाही.यासाठी दुर्लक्ष न करता वा तात्पुरती मलमपट्टी न करता उखडलेला डांबरी रस्ता तात्काळ दुरुस्त करावा; अशी मागणी कोरची शहर वासियांनी केली आहे.