उद्रेक न्युज वृत्त
बीड : कर्ज मागणीच्या हप्त्याच्या तगाद्याला कंटाळून जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही धक्कादायक घटना बीडच्या धारूर तालुक्यातील आसरडोह शिवारात घडली आहे.नितीन लक्ष्मण पाटोळे वय ३४असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
मुख्याध्यापक नितीन पाटोळे यांनी बीडच्या माजलगाव येथील मंगलनाथ मल्टीस्टेटच्या दिंद्रूड शाखेकडून २०१९ मध्ये वैयक्तिक कर्ज घेतले होते. सुरूवातीला १० हजार रुपये हप्त्याने कर्जाची परतफेड केली. मात्र कोरोना काळात काही हप्ते थकले.त्यानंतर जून २०२२ रोजीपासून १५ हजार रुपये हप्ता ते भरत होते.तरी देखील मंगलनाथ मल्टीस्टेटचे वसूली पथकातील अधिकाऱ्यांनी कर्जफेडीसाठी तगादा लावला होता.त्यांना सातत्याने त्रास देऊन कारवाईची धमकी देत होते.यामुळे पाटोळे व्यथित होते.यातूनच कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
नितीन पाटोळे यांच्या पश्चात आई- वडील,पत्नी,दोन मुली असा आप्त परिवार असून त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.