उद्रेक न्युज वृत्त :- केंद्र शासनाच्या सूचनेनुसार गरजू लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून वर्षभर मोफत अन्नधान्य देण्यात येत आहे.अशातच आता राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी रेशन कार्डधारकांना अन्नधान्य न देता त्यांच्या खात्यात रोख रक्कम देण्यात येणार आहे.राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला असून प्रत्येक लाभार्थ्याला १५० रुपये रोख मिळणार आहे.
राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित आहे. गेल्या काही काळापासून केंद्र शासनामार्फत राज्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणारा गहू आणि तांदूळ देण्यात येत नसल्याने लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे.आता प्रति माह प्रति लाभार्थी १५० रुपये इतकी रक्कम लाभार्थीच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.राज्यातील जवळपास १४ जिल्ह्यांत आत्महत्या ग्रस्तांचे प्रमाण जास्त आहेत.