- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे अपघातग्रस्त रुग्णाची हेळसांड झाल्याची बातमी काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्याच्या अनुषंगाने रुग्णालय प्रशासनाने तात्काळ सविस्तर चौकशी करून सदर प्रकरणात रुग्णाला वेळेत व योग्य उपचार देण्यात आल्याचा खुलासा केला आहे.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा एस. लहाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात घटनेची वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.
विकास गुरुनाथ नाडपल्लीवार वय ३० वर्षे,रा.चुरचूरा, ता.आरमोरी,जि.गडचिरोली हे सोमवार,१६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे दीड वाजता रस्ते अपघातात (RTA)डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथील आकस्मिक विभागात दाखल झाले.
रुग्ण दाखल होताच कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.भिमराव धुर्वे(CMO)यांनी तातडीने प्राथमिक उपचार सुरू केले.रुग्णाचे त्वरित एक्स-रे काढण्यात आले.तसेच अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ (Ortho Surgeon),जनरल सर्जन व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी स्वतः रुग्णाची तपासणी करून पुढील उपचाराबाबत वैद्यकीय निर्णय घेतला.रुग्णाच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन उच्चस्तरीय उपचारांची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आल्याने तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे संदर्भित(Referral) करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रुग्णाला पुढील उपचारासाठी हलविण्यासाठी प्रशासनाकडून तात्काळ १०८ शासकीय रुग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला होता. जिल्हास्तरावर तीन १०८ रुग्णवाहिका उपलब्ध असून संबंधित दिवशी दोन रुग्णवाहिका शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे संदर्भित रुग्णांना घेऊन गेल्या होत्या.तर एक रुग्णवाहिका धानोरा येथून रुग्ण घेऊन मुख्यालयाकडे परत येत होती,ज्यास पोहोचण्यासाठी सुमारे एक तासाचा कालावधी अपेक्षित होता.या पार्श्वभूमीवर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेची प्रतीक्षा न करता खाजगी वाहनाद्वारे रुग्णाला तातडीने हलविण्याची तयारी दर्शवली.त्यांनी लेखी संमती दिल्यानंतर रुग्णाला खाजगी वाहनाने पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
हलगर्जीपणाचा आरोप फेटाळला👇
रुग्णालयातील डॉक्टर्स व परिचारिका यांनी रुग्णाला वेळेत व आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत पुरविली होती.उपचार प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा एस.लहाडे यांनी स्पष्ट केले की, “रुग्णाच्या उपचारात कोणतीही कुचराई झालेली नसून तात्काळ उपचार,तज्ज्ञ तपासणी आणि योग्य वेळी संदर्भ देण्याची प्रक्रिया नियमांनुसार पार पाडण्यात आली आहे.”
- बातमीतील सत्यता👇
आरमोरी तालुक्याचता चुरमुरा येथील विकास गुरुनाथ ताडपल्लीवार हा तरुण १६ फेब्रुवारी रोजी भीषण अपघातात गंभीर जखमी झाला.पत्नीला कामावर सोडून घरी परत जात असतांना ट्रकने दिलेल्या धडकेत विकासच्या डाव्या पायाचे हाड मोडले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या मजुराला स्थानिकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.दुपारी १ वाजता दाखल केलेल्या या रुग्णावर सायंकाळी ५ वाजेपर्यंत केवळ थातूरमातूर मलमपट्टी करण्यात आली. ‘एक्स-रे’ मशीन बंद आहे आणि अस्थिरोगतज्ज्ञ उपलब्ध नाहीत,असे कोरडे उत्तर देऊन रुग्णालयाने आपली जबाबदारी झटकली.धक्कादायक बाब म्हणजे,गंभीर अवस्थेत असलेल्या या रुग्णाला चंद्रपूरला हलवण्यास सांगूनही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली नाही. पोटचा गोळा वेदनेने तडफडत असतांना आणि खिशात दमडी नसतांना,हतबल पित्याने अखेर उसनवारी करून खासगी रुग्णवाहिकेचे भाडे भरले आणि मुलाला चंद्रपूरला नेले.असे वृत्त ‘लोकसत्ता’ ने प्रसारित केले होते.
- Advertisement -

