उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
कोंढाळा(देसाईगंज) :-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावातील एका ६५ वर्षीय महिलेला तिच्या राहत्या घरी नाग सापाने दंश केल्याची घटना मागील आठवड्याच्या सोमवार, दिनांक-१ जुलै ला घडली होती.सापाने दंश करताच क्षणाचाही विलंब न लावता महिलेला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.आठवडाभरापासून उपचार सुरू असतांनाच काल,सोमवार दिनांक-८ जुलै च्या रात्री ९.३० वाजेच्या सुमारास सदर महिलेचा गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.सुभद्रा मारोती राऊत वय ६५ वर्षे, रा.कोंढाळा,ता.देसाईगंज, जि.गडचिरोली,असे सर्प दंशाने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,मागील आठवड्याच्या सोमवारी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान सुभद्रा राऊत ह्या शेतावरून कामे करून आल्यानंतर कुटुंबीयांसाठी आंबील बनविण्याकरीता गव्हाचे पीठ काढण्यासाठी घरामध्ये ठेवलेल्या डब्ब्या जवळ गेल्या असता,त्यांच्या पायाला नाग सापाने दंश केला होता.सापाने दंश केल्याची माहिती मिळताच घरातील कुटुंबीय तसेच शेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घरामध्ये शोधाशोध केल्यानंतर खरोखरच नाग साप आढळून आला.सापा बद्दलची माहिती वन विभागास देण्यात आली.त्यानुसार वन विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून सापाला पकडुन जंगलात सोडले.
अशातच कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न लावता सर्वप्रथम रुग्णालय गाठले.उपचाराकरिता सुभद्रा यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,आठवडाभर उपचार सुरू असतांनाही सुभद्रा यांची प्राणज्योत सर्प दंशामुळे मावळली आहे. आज,९ जुलै रोजी राहत्या गावी दुपारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.