- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून ज्ञानसमृद्ध,वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली आणि स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज अशी पिढी घडविण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर आणि मोहसीनभाई जव्हेरी महाविद्यालय देसाईगंज यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज,गुरुवार १५ ऑक्टोंबर रोजी नैनपूरच्या शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.विविध विषयांवरील ग्रंथांचे आकर्षक प्रदर्शन हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
- शाळेच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी दारे👇
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची गोडी निर्माण व्हावी,त्यांची आकलनक्षमता, शब्दसंपत्ती,विचारशक्ती आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित व्हावे,तसेच स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करण्यासाठी त्यांना उपयुक्त साहित्य उपलब्ध व्हावे, या व्यापक शैक्षणिक दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.शाळा आणि महाविद्यालय यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना वाचनाच्या समृद्ध विश्वाशी जोडण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे.
उपक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षा,थोर व्यक्तींचे जीवनकार्य, महान शास्त्रज्ञांचे संशोधन,विचारवंतांचे विचार आणि प्रेरणादायी साहित्य यांवर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले.या ग्रंथप्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विविध ज्ञानशाखांची ओळख झाली आणि पुस्तकांमधून नवे विचार आत्मसात करण्याची प्रेरणा मिळाली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नगर परिषद देसाईगंजचे आरोग्य सभापती चैतनदास विधाते यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषद देसाईगंजचे शिक्षण सभापती बाळकृष्ण माडूलवार होते.प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका ज्योत्सना लुटे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमाकांत कवासे,रामलाल बगमारे,मोहसीनभाई जव्हेरी महाविद्यालयाचे ग्रंथपाल नाजीम शेख,शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे,तसेच पल्लवी बगमारे आणि रागिणी मिसार उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी केले.त्यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करतांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुस्तकांचे योगदान आणि शाळा-महाविद्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता विशद केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक बुराडे यांनी केले,तर आभार प्रदर्शन शिक्षक पुसाला यांनी केले.या कार्यक्रमाला मोहसीनभाई जव्हेरी महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,गावातील प्रतिष्ठित नागरिक,युवकवर्ग, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- शाळेच्या शैक्षणिक वाटचालीतील प्रेरणादायी पाऊल👇
‘ग्रंथालय आपल्या दारी’ हा उपक्रम केवळ पुस्तकांचे प्रदर्शन नसून विद्यार्थ्यांच्या मनात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी,त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी आणि स्व-अध्ययनाची सवय विकसित करण्यासाठी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शाळा,महाविद्यालय आणि समाज यांच्या एकत्रित सहभागातून वाचनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
“वाचनातून ज्ञान,ज्ञानातून प्रगती आणि प्रगतीतून उज्ज्वल भविष्य!” या विचाराला कृतीची जोड देत महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, नैनपूर आणि मोहसीनभाई जव्हेरी महाविद्यालय, देसाईगंज यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी एक प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे.

- Advertisement -

