उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नववे राष्ट्रीय अधिवेशन ७ ऑगस्टला पंजाबमधील अमृतसरच्या गुरुनानक देव विद्यापीठाच्या गोल्डन ज्युबिली कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनाला जिल्ह्यातील जवळपास ३०० ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनात ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना,ओबीसी क्रिमिलेअर मर्यादावाढ,स्वतंत्र ओबीसी मंत्रालय,आरक्षणासाठी ५० टक्क्यांची अट रद्द करा,यासह समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने मंथन होईल.समारोपीय सत्रात या अनुषंगाने ठरावही पारित केले जाणार आहेत. अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते होईल.प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर,दिनेश चोखारे,महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

