- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील २६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.जिल्ह्यात १३ हजार ६०८ पदवीधर मतदारांची नोंदणी असून,मतदानासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.नोंदणीकृत पदवीधर मतदारांनी आपल्या तालुक्यातील मतदानाची वेळ लक्षात घेऊन मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
जिल्ह्यातील एकूण मतदारांमध्ये ९ हजार ३१० पुरुष आणि ४ हजार २९८ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदान साहित्य वाटप केंद्रांवरून मतदान पथके पोलीस बंदोबस्तात आपापल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाली आहेत.
- चार तालुक्यांतील मतदानाच्या वेळेत बदल👇
भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित अधिसूचनेनुसार, एटापल्ली,भामरागड,सिरोंचा आणि अहेरी या चार तालुक्यांतील सर्व मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.या तालुक्यांतील मतदानाची समाप्तीची वेळ दुपारी ४ ऐवजी दुपारी ३ वाजता करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील गडचिरोली,चामोर्शी,देसाईगंज,आरमोरी, कुरखेडा,धानोरा,मुलचेरा आणि कोरची या उर्वरित आठ तालुक्यांत सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल.संबंधित मतदारांनी बदललेल्या वेळेची नोंद घेऊन वेळेत मतदान केंद्रावर उपस्थित राहावे.
- गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक मतदार👇
जिल्ह्यात गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक ६ मतदान केंद्रे आणि ३ हजार ४१६ मतदार आहेत.चामोर्शी तालुक्यात आष्टीसह ४ केंद्रांवर २ हजार १२५, देसाईगंजमध्ये ३ केंद्रांवर १ हजार ८३९,आरमोरीमध्ये ३ केंद्रांवर १ हजार ७५६,कुरखेड्यात २ केंद्रांवर १ हजार २८८ आणि अहेरीमध्ये २ केंद्रांवर १ हजार १२० मतदारांची नोंदणी आहे.
धानोरा,मुलचेरा,एटापल्ली,सिरोंचा,कोरची आणि भामरागड या तालुक्यांत प्रत्येकी एक मतदान केंद्र आहे.धानोरा येथे ४७८,मुलचेरा येथे ४१४,एटापल्ली येथे ३५४,सिरोंचा येथे ३२७,कोरची येथे २९२ आणि भामरागड येथे १९९ मतदार आहेत.
- विभागात ४४५ मतदान केंद्रे; ३८ उमेदवार रिंगणात👇
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात नागपूर,वर्धा, भंडारा,गोंदिया,चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.विभागात एकूण ४४५ मतदान केंद्रे असून,२ लाख ५५ हजार ६०३ मतदारांची नोंदणी आहे.यामध्ये १ लाख ४७ हजार २८० पुरुष,१ लाख ८ हजार ३०१ महिला आणि २२ इतर मतदारांचा समावेश आहे.निवडणुकीत एकूण ३८ उमेदवार रिंगणात आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.विभागात मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी २ हजार ५३५ शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच केंद्र सरकारचे ४७६ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
- शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजा; खासगी कर्मचाऱ्यांना चार तासांची सवलत👇
नोंदणीकृत पदवीधर मतदार असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे.तसेच खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या नोंदणीकृत पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी चार तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश निवडणूक प्रशासनाने दिले आहेत.
- २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी👇
मंगळवार,२७ ऑक्टोंबर रोजी नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुल,मानकापूर येथे मतमोजणी होणार असून,संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोंबरपूर्वी पूर्ण केली जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत पदवीधर मतदारांनी मतदानात सहभागी व्हावे.विशेषतः एटापल्ली, भामरागड,सिरोंचा आणि अहेरी तालुक्यांतील मतदारांनी दुपारी ३ वाजेपर्यंत असलेली मतदानाची वेळ लक्षात घेऊन नियोजन करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
- Advertisement -

