- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-एका ठगबाजाने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दोन बहिणींची तब्बल ४८ लाखाहून अधिकच्या रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली शहरात उघडकीस आला आहे. प्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी ठगबाजाच्या मुसक्या आवळल्या. मिथुन प्रभाकर गायकवाड वय ४२ वर्षे,रा.खेडेगाव, ता.कुरखेडा,जि.गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला मंगळवार,२८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी मिथुन गायकवाड हा एका खासगी बँकेत सेल्स ऑफिसर म्हणून कार्यरत होता.दरम्यान,तो गडचिरोली शहरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या जुली मारोती शिरपूरकर व सविता पोहनकर या दोघी बहिणींकडे गेला आणि त्यांना भूलथापा देऊन दोघींच्याही नावाने त्याने एचडीएफसी आणि एक्सिस बँकेत खाते उघडून दिले.त्यात दोघींनीही व्यवसायातून जमा केलेली रक्कम भरली.मात्र,मिथुनने खात्याचे सर्व नियंत्रण आपल्याकडेच ठेवले.विशेष म्हणजे,आरोपी मिथुन हा पूर्वी एचडीएफसी बँकेत कार्यरत होता.तेथून काढल्यानंतर तो ॲक्सिस बँकेत रुजू झाला.परंतु तेथूनही नोकरी गेल्यानंतर सध्या तो कुरखेडा येथील एका पतसंस्थेचा अभिकर्ता म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.खात्याचे सर्व नियंत्रण आपल्याकडेच ठेवल्यानंतर मिथुनने त्यांच्या खात्यातून २८ लाख ५४ हजार रुपये थेट काढले व ८ लाख रुपये परवानगीशिवाय काढले आणि ११ लाख ८३ हजार ७८७ रुपये ऑनलाईन व्यवहारातून हडप केले.अशाप्रकारे एकूण ४८ लाख ३७ हजार ७८७ रुपयांनी मिथुन गायकवाडने दोघी बहिणींची फसवणूक केली.खात्यातील रक्कम आम्ही न काढता दुसरा कुणीतरी काढत असल्याचे दोघींना संशय आल्याने त्यांनी याबाबत मिथुनला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.संशय बळावल्याने जुली शिरपूरकर यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.त्यानंतर,गडचिरोली पोलिस ठाण्याचे ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने आरोपी मिथुन गायकवाडच्या मुसक्या आवळल्या.
- Advertisement -

