उद्रेक न्युज वृत्त
उमरेड(नागपूर) :- अगदी पहाटेच्या प्रहरी वाघाने डाव साधत एका गायीची शिकार केली.काहीतरी घडून गेल्याची चाहूल शिक्षक-कर्मचाऱ्यांना लागली होती.त्यानंतर अगदी सकाळच्या सुमारास ‘त्या’ निवासी शाळेतील कर्मचाऱ्यांनी जनावरे बांधलेले ठिकाण गाठले.दोन महिला,मजूर आणि मुलगा रक्तबंबाळ असलेल्या गायीला बघावयास गेले.वाघाने गायीची शिकार साधल्याचे लक्षात आले.’ते’ सर्वजण वाघाला शोधक नजरेतून बघत होते.दुसरीकडे अगदी १० फुटांवर वाघोबा चौघांनाही बघत होता,शिकार साधल्यानंतर वाघोबा अगदी इथेच आहे, हे त्यांना कळलेसुद्धा नाही.अंगाचा थरकाप उडविणारा हा जीवघेणा प्रसंग उमरेड तालुक्यातील चांपा येथील नवीन देसाई निवासी शाळेच्या परिसरात घडला.या प्रसंगाला चार दिवसांचा कालावधी लोटला असला तरी आजही वाघाच्या भीतीने येथील शिक्षक,कर्मचारी आणि निवासी विद्यार्थी कमालीचे भयभीत झाले आहेत.
उमरेड तालुक्यातील चांपा येथील निवासी शाळेत सध्या दहा विद्यार्थी निवासी आहेत.शिक्षक,कर्मचारी पाच आहेत.निवासी विद्यार्थ्यांना दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मिळावे,या हेतूने जनावरे पालनाचे काम सुरू झाले.मागील काही वर्षांपासून वाघ या परिसरात नजरेस पडू लागला.दरम्यान,वाघाने दोन गायींची शिकारही साधली.दोनदा वाघाच्या हल्ल्यातून गोऱ्हेही बचावले.अनेकदा वनविभागाकडे शाळा परिसरातील ही गंभीर बाब मांडली गेली.वाघाचा वावर या भागात कमालीचा वाढला.या कारणाने मुलांना वाघाचा धोका होऊ शकतो,अशीही भीती व्यक्त झाली.दरम्यान,काही दिवसांपूर्वी अगदी पहाटे वाघाने गायीची शिकार केली. सकाळच्या सुमारास तुलाराम कुंभरे,शोभा ठाकरे, पुष्पा कुंभरे,मुलगा साहिल जयदेव यांनी जनावरे बांधलेल्या परिसरात पाहणी केली.रक्तबंबाळ मृत अवस्थेत गाय नजरेस पडली.चौफेर नजर फिरविली असता,अगदी १० फुटांच्या अंतरावर वाघ निवांतपणे बसला होता.लागलीच चौघेही जनावरांच्या गोठ्यात शिरले.तो काही वेळ बसून होता.पुन्हा इकडून तिकडे फेऱ्या मारू लागला.सुमारे २० मिनिटे हा थरारक प्रकार सुरू होता.त्यानंतर वाघ हळूच निघून गेला.वाघ परत गेल्याने चौघेही सुखरूप बाहेर पडले.सर्वांनी शाळेच्या दिशेने धाव घेतली.काही वेळेतच वनविभागाची चमू घटनास्थळी पोहोचली.त्यांनी पंचनामा केला.
वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे विद्यार्थी,शिक्षक, कर्मचारी भयभीत झाले आहेत.वनविभागाने योग्य उपाययोजना करावी; अशी मागणी केली जात आहे. शिवाय तारेच्या कुंपणाचीही व्यवस्था करण्यात यावी; अशीही मागणी जोर धरत आहे.

