उद्रेक न्युज वृत्त
अमरावती :- ‘माझी लाडकी बहीण’ योजना सुरू झाल्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी महिलांनी पहिल्या दिवसापासूनच तहसील कार्यालयात गर्दी केली.पण या योजनेच्या नावाखाली काही जण अर्जदार महिलांची लूट करीत असल्याचा एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
अमरावती जिल्ह्यातल्या वरूड येथे अर्जदार महिलांकडून पैसे घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी तलाठी तुळशीराम कंठाळे याला निलंबित करण्यात आल्याची घटना काल,मंगळवारी दिनांक- २ जुलै रोजी घडली.
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण योजना’ एक जुलैपासून सुरू केली.या योजनेसाठी २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिला पात्र असून याकरिता तलाठी कार्यालय तसेच शहरी भागात तहसील कार्यालयात आणि कृउबासमध्ये अर्ज उपलब्ध करून दिले आहेत.अमरावती शहरासह जिल्ह्यात सर्व ठिकाणी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे.वरूड येथे या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तुळशीराम कंठाळे हा तलाठी चक्क महिलांकडून पैसे वसूल करीत असल्याचे समोर आले आहे.महिलांकडून पैसे उकळतानाचा त्याचा व्हिडीओ आणि फोटोदेखील व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली.
जिल्ह्यातील सर्व तहसील आणि तलाठी कार्यालयात कागदपत्रांसाठी महिलांची गर्दी झाली आहे. सकाळपासूनच महिला येथे रांगा लावून असतात. आता त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार उघडकीस आल्याने जिल्ह्यात इतरही भागत महिलांची आर्थिक लूट होत असल्याची शंका येत आहे.
मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ ही योजनेंतर्गत महिलांना लाभ मिळावा असा उद्देश असताना या योजनेसाठी लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याच्या प्रतापाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली.यामुळेच त्या तलाठ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

