- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या तब्बल ७० विद्यार्थ्यांना अचानकपणे उलटी,मळमळ व तीव्र पोटदुखीचा त्रास सुरु झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.यातील ११ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सदरचा प्रकार आज,बुधवार २८ जानेवारी रोजी भामरागड तालुक्याच्या लाहेरी येथील शासकीय आश्रम शाळेत उघडकीस आला.
लाहेरी शासकीय आश्रम शाळेत एकूण २३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.२३० विद्यार्थ्यांपैकी तब्बल ७० विद्यार्थ्यांना दुपारच्या सुमारास अचानक उलटी, मळमळ व तीव्र पोटदुखीचा त्रास सुरु झाला.यामुळे उपस्थितांची भंबेरी उडाली आणि तात्काळ विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानुसार,लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० विद्यार्थ्यांवर,तर भामरागड ग्रामीण रुग्णालयात ४० विद्यार्थ्यांवर उपचार सुरु करण्यात आले. यातील ११ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ पुढील उपचारार्थ अहेरी उपजिल्हा रुग्णालय भरती करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी अमर राऊत, तहसीलदार किशोर बागडे,सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोशन चव्हाण यांच्यासह अधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णालय व आश्रम शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत आरोग्य विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या.विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून जेवण वा पिण्याच्या पाण्यातून सदरचा प्रकार घडला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- Advertisement -

