- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात मागील खरीप हंगामात ऐन धान कापणी सुरू असतांना ऑक्टोंबर-२०२५ मध्ये अवकाळी पावसाने झोडपले.महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करून अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आणि केवायसीही केली.मात्र,अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात दमडीही जमा झाली नाही.त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडून नुकसाभरपाईची रक्कम जमा होण्याची वाट पाहत आहेत.
खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने धानपीक जोमात होते.ऑक्टोंबर २०२५ मध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उभे पीक जमीनदोस्त झाले.कापणी केलेल्या कडपा बांधात पाणी साचल्याने पूर्णतः सडून गेल्या.आडवे पडलेल्या धान लोंबाला अंकुर फुटले.या नुकसानीचे कृषी विभाग, महसूल विभागाकडून पंचनामे युद्धस्तरावर करण्यात आले.संबंधित विभागाकडून नुकसानग्रस्तांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच नुकसानभरपाई मिळेल,अशी आशा होती.मात्र,अद्याप एकाही शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची दमडीही जमा झाली नाही.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई मिळालेली नसतांना स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.अनेक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईच्या मदतीच्या भरवशावर रब्बी पिकाचे नियोजन केले.मात्र भरपाईच मिळाली नसल्याने रब्बी पिकाचे नियोजन करतांना शेतकऱ्यांना आर्थिक ओढाताण करावी लागत आहे.
- Advertisement -

