उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध-व्यवसाय,पैसे आणि दारूची वाहतूक रोखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पथकाने गोरेगाव तालुक्यातील सोनी येथील नाक्यावर एका कारमधून १ कोटी ७६ लाख रुपयांची रोख रक्कम काल, बुधवारी दिनांक – २७ मार्च रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास जप्त केली.लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना आमिष देण्यासाठी रोख रक्कमेचा वापर केला जातो.त्यामुळे प्रकाराला आळा घालण्यासाठी निवडणूक विभागाने जिल्ह्यात ठिकठिकाणी नाके उभारून भरारी पथकाची नेमणूक केली आहे.लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल,बुधवार शेवटचा दिवस होता. अजून प्रचाराला सुरुवात व्हायची असून त्यापूर्वीच निवडणुकीसाठी पैशाची वाहतूक सुरू झाली आहे.काल,बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास गोंदिया-ठाणा ते गोरेगावकडे जाणाऱ्या कारची सोनी नाक्याजवळ निवडणूक विभागाचे एफएसटी व एसएसटी पथक प्रमुख बाबा शिंदे,सरिता लिल्हारे, विलास सूर्यवंशी, रंजना चानप, रामानंदा दास, श्यामकला भोयर,संदीप पटले यांनी तपासणी केली. दरम्यान कारमधून १ कोटी ७६ लाख रुपयांची रक्कम जप्त केली.यावेळी तहसीलदार किसन भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून मिळालेली रक्कम सील करण्यात आली.पंचनामा इएसएमएस ॲपवर भरून पुढील कारवाई केली.पोलिस निरीक्षक अजय भुसारी व पोलिस उपनिरीक्षक घोलप यांनी कायदेशीर कारवाई केली.या कारवाईसाठी तहसीलदार गोमासे व निवडणूक निर्णय अधिकारी पूजा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात केलेली ही पहिलीच कारवाई आहे.

