उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता ” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते.व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे चौदावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३२ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात नवेगाव येथील नवोदित कवी गजानन भिकाजी गेडाम यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “क्षमा” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
गजानन गेडाम हे नवेगाव (जि.गडचिरोली) येथील नवोदित कवी असून शंभरावर कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे.नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘रानगर्भ फुलत आहे ‘ या प्रातिनिधिक कविता संग्रहात त्यांच्या दोन कविता प्रकाशित झालेल्या आहेत.ते आरोग्य विभागात जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवेत असून विविध स्तरावरुन त्यांचा सत्कार झालेला आहे.ते सातत्याने कविता लेखनाचे व रक्तदानाचे कार्य करीत आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे व प्रा.अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या चौदाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने जयराम घोंगडे,गणेश रामदास निकम,पुरुषोत्तम ठाकरे, तुळशीराम उंदीरवाडे,पुजा गिरी,मधुकर दुफारे, प्रशांत गणवीर, माधुरी अमृतकर,मुर्लीधर खोटेले,वामनदादा गेडाम,प्रा.पांडूरंग (राज) मुंजाळ,पी.डी.काटकर, प्रा. विनय पाटील, प्रेमिला अलोने,नागोराव सोनकुसरे, संतोष कपाले, संगीता रामटेके,ज्योत्स्ना बन्सोड, संजय बन्सल,मनिषा हिडको, अंगुलिमाल मायाबाई उराडे, नरेंद्र गुंडेली,चरणदास वैरागडे, संदिप आंबोरकर, उपेंन्द्र रोहनकर,खुशाल म्हशाखेत्री,विलास जेंगठे,पुरुषोत्तम लेनगुरे , सुजाता अवचट, गजानन गेडाम,रेखा दिक्षित इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
– चुडाराम बल्हारपुरे (नाटककार)

