उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त तोडगट्टा येथे खाणींविरोधात सुरू असलेले आंदोलन पोलिसांसोबत झालेल्या वादानंतर उधळण्यात आले.यावरून आता नक्षलवादी आक्रमक झाले आहेत.माओवादी संघटनेचा पश्चिम सबझोनल प्रवक्ता श्रीनिवास याने एक पत्रक जारी केले आहे.या पत्रकातून नक्षल्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तोडगट्टा आंदोलकांची सुटका करण्याच्या मागणी करीत ३० नोव्हेंबर रोजी जिल्हा बंदची हाकही दिली आहे.
सूरजागड येथे दोन वर्षांपूर्वी लोहखाण उत्खननाला सुरुवात झाल्यानंतर एटापल्ली तालुक्यात आणखी सहा लोहखाणी प्रस्तावित आहेत.यास विरोध करत मागील अनेक दिवसांपासून दमकोंडवाही खाणविरोधी कृती समितीच्या झेंड्याखाली परिसरातील नागरिकांचे तोडगट्टा येथे आंदोलन सुरू होते.२० नोव्हेंबरला आंदोलनस्थळापासून जवळच वांगेतुरी येथे पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आले.या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथक परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना आंदोलक व पोलिस समोरासमोर आले.नक्षल्यांनी पत्रकातून वांगेतुरी येथील पोलीस मदत केंद्र हटविण्यासह आंदोलकांची सुटका करा; या मागणीला घेऊन ३० नोव्हेंबरला जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.तसेच ग्रामसभांनाही गावागावात या विरोधात आंदोलन सुरू करण्याचे आवाहन केले.नक्षली प्रवक्ता श्रीनिवास याने या पत्रकात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनाही आंदोलनकर्त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत; अशी मागणी करण्यात आली आहे.

