- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन होणे ही अत्यंत समाधानाची बाब असून लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था,तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेला हा उपक्रम शेकडो कुटुंबांसाठी नवसंजीवनी ठरेल,असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील बालकांना अत्याधुनिक हृदयरोग निदान व मोफत उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला व बाल रुग्णालय,गडचिरोली येथे आज,रविवार ५ जुलै रोजी मोफत 2D Echo व बाल हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हेही दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजहितासाठी केले जाणारे हे कार्य ईश्वरी कार्य असून अशा उपक्रमांना सातत्य मिळावे,अशी अपेक्षा व्यक्त करत या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे अभिनंदन केले.
सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील बालकांमध्ये जन्मजात हृदयविकारांचे वेळेत निदान करून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचे सांगितले. वैद्यकीय मदत कक्ष,ज्युपिटर हॉस्पिटल आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात येत असून गरजू बालकांना आवश्यक त्या सर्व सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातील,असे त्यांनी स्पष्ट केले.
दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करतांना सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूचे विशेष कौतुक केले.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात येऊन बालकांची तपासणी व उपचारासाठी सहकार्य करणे ही समाजसेवेची प्रेरणादायी भावना असल्याचे सांगत त्यांनी गरजू बालकांच्या पुढील शस्त्रक्रिया व उपचारासाठी शासन व आरोग्य विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल,अशी ग्वाही दिली.
या शिबिरात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ३०० हून अधिक बालकांची अत्याधुनिक 2D Echo तंत्रज्ञानाद्वारे मोफत तपासणी करण्यात आली.ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. आशुतोष सिंग व त्यांच्या चमूने ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची सविस्तर तपासणी केली.या तपासणीद्वारे जन्मजात हृदयविकार,हृदयाच्या झडपांचे विकार तसेच रक्तप्रवाहातील अडथळ्यांचे निदान करण्यात आले.पुढील उपचार अथवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांवर मोफत उपचार करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
शिबिरादरम्यान राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके)अंतर्गत अहेरी तालुक्यातील दोन वर्षीय अन्विका सूरज गौरकर हिची यशोगाथा सादर करण्यात आली.अंगणवाडी स्तरावरील नियमित आरोग्य तपासणीत आरबीएसके पथकाने तिच्यामध्ये हृदयविकाराची लक्षणे ओळखली.पुढील तपासणीत तिला व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट(VSD)अर्थात जन्मजात हृदयाला छिद्र असल्याचे निदान झाले. शिबिरात तिची पुढील तपासणी करण्यात आली असून तिच्यावर आवश्यक शस्त्रक्रिया व उपचार पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, समन्वयक डॉ.सौरभ अग्रवाल,सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार शेटे,संदीप ठाकूर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे,महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.माधुरी किलनाके,आरबीएसके समन्वयक प्रशांत खोब्रागडे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
- Advertisement -

