- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांचे सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत असणारे ४३ वर्षीय उमाजी होळी यांच्या बंदुकीतून एकापाठोपाठ एक अशा सात गोळ्या सुटून तीन गोळ्या त्यांच्या छातीत घुसल्याने होळी यांचा मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवारी ११ डिसेंबरच्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास जिल्हा न्यायालयाच्या आवारात घडली.होळी यांनी जीवन संपवले की अनावधानाने त्यांच्या बंदुकीतून गोळ्या सुटल्या,याचा तपास सुरू आहे.
उमाजी होळी हे जिल्हा पोलिस दलात अंमलदार असून,प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांचे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते.नेहमीप्रमाणे आज बुधवारी होळी व अन्य सुरक्षारक्षक हे न्यायाधीशांना घेऊन न्यायालयात गेले.न्यायाधीश वाहनातून उतरल्यानंतर चालकाने सुरक्षारक्षकांचे वाहन न्यायालयाच्या आवारातील एका झाडाखाली पार्क केले.त्यानंतर अन्य सुरक्षा रक्षक वाहनातून उतरले,तर उमाजी होळी हे वाहनातच बसून होते.काही वेळातच होळी यांच्या बंदुकीतून एकापाठोपाठ एक अशा सात गोळ्या सुटल्या.यापैकी तीन गोळ्या त्यांच्या छातीत घुसल्या, उर्वरित गोळ्या वाहनाच्या छतातून बाहेर निघाल्या.या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.पोलिस व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी अंमलदार होळी यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.होळी यांनी जीवन संपवल्याची चर्चा परिसरात होती.त्यांनी जीवन संपवले की अनावधानाने त्यांच्या बंदुकीतून गोळ्या सुटल्या,याविषयी पोलिस तपास करीत आहेत.
- Advertisement -

