- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-जिल्ह्याच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर परिसरात एका वाघाच्या मृत्यूची घटना उघडकीस आली आहे.विहिरीला कठडे नसल्याने वाघ थेट शेतातील विहिरीत पडून मृत पावल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा वनपरिक्षेत्रातील माल्ही बीट अंतर्गत येणाऱ्या कोडेलोहारा परिसरात आज,रविवार १२ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. विहिरीत पडून मृत पावलेला वाघ हा चार ते पाच वर्षाचा होता.
आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास कोडेलोहारा येथील शेतकरी रुपचंद इसन कावळे यांच्या शेतातील विहिरीत वाघ पडल्याची माहिती वन विभागास मिळताच नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव वन क्षेत्राचे जलद बचाव पथक आणि भंडारा वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.नवेगाव नागझिराचे उपसंचालक प्रितमसिंग कोडापे,सहाय्यक वनसंरक्षक विजय धांडे,मनिषा चव्हाण तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी रविकमल भगत आणि टेंभरे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आणि अथक परिश्रमानंतर वाघाला विहिरीतून बाहेर काढले.प्राथमिक तपासात सदरचा वाघ हा शिकारीच्या वा पाण्याच्या शोधात भटकत असतांना तोल जाऊन विहिरीत पडला असावा,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.अपघात की काय? याचा तपास सुरू असून वनविभागाने ‘व्हिसेरा सॅम्पल’ प्रयोगशाळेत पाठवला. वाघाच्या मृत्यूचे खरे कारण हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
- Advertisement -

