- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर केला आहे.आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,उत्पादनवाढीसाठी केलेले प्रयोग आणि इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणाऱ्या कार्यामुळे या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकरी, संस्था आणि कृषी क्षेत्रातील कार्यकर्त्यांना दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.यामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार,वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, कृषिभूषण(सेंद्रिय शेती)पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार,उद्यानपंडित पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे.
या पुरस्कारांचे वितरण येत्या,१ जुलै २०२६ रोजी मुंबई येथील वरळी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात माननीय राज्यपालांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
- सन २०२३-२४ साठी पुरस्कारार्थी👇
सन २०२३-२४ साठी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार(सर्वसाधारण गट)हा पुरस्कार आरमोरी तालुक्यातील शंकरनगर(पो.जोगीसाखरा)येथील विष्णुपद प्रभाष गाईन यांना जाहीर झाला आहे.तर वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार(आदिवासी गट)हा पुरस्कार एटापल्ली तालुक्यातील वडसाकला येथील दयाराम सुखरू सिडाम यांना घोषित करण्यात आला आहे.
- सन २०२४-२५ साठी पुरस्कारार्थी👇
सन २०२४-२५ साठी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार(सर्वसाधारण गट)हा पुरस्कार आरमोरी तालुक्यातील कोरेगाव(पो.रांगी)येथील पुरुषोत्तम झेलुजी जांभूळकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
- पुरस्काराचे स्वरूप👇
या पुरस्कारात विजेत्या शेतकऱ्याला ४४ हजार रुपयांचा धनादेश,स्मृतिचिन्ह(ट्रॉफी),प्रशस्तिपत्र तसेच सपत्नीक/पतीसह विशेष सत्कार करण्यात येतो.
- कृषी क्षेत्रातील आदर्श कार्याची दखल👇
शेतीमध्ये नवनवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे,उत्पादनात भरीव वाढ साध्य करणे, कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग राबविणे आणि इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे आदर्श कार्य करणे या कठोर निकषांच्या आधारे कृषी विभागाकडून या तिन्ही शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा प्रशासन व कृषी विभागाकडून पुरस्कारार्थी शेतकऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी कळविले आहे.
- Advertisement -

