उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- सध्याच्या घडीला शेतकरी बांधवांपुढे मोठे अस्मानी संकट निर्माण झाले आहे.अशातच इकडे आड तिकडे विहीर काहीशी अशीच स्थिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे. नेहमीच्या कीट-किटीने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.मार्च एंडिंगच्या तडाख्यात शेतीसाठी उचल केलेल्या कर्जाची परतफेड तर आवाक्याबाहेरचे घरगुती व कृषिपंपाचे वीज बिल अशी दुधारी तलवार सध्या शेतकऱ्याच्या मानगुटीवर कायम आहे.त्यामुळे कर्जाची परतफेड करायची की वीजबिल भरायचे? असा दुहेरी प्रश्न शेतकऱ्यांपुढे आवासून उभा आहे. बहुतांश शेतकरी पावसाळ्याच्या सुरुवातीला कर्ज घेऊन आपल्या शेतमशागतीच्या कामाला लागतात. आपल्या शेतातून अधिकाधिक उत्पन्न व काढून कर्जाची परतफेड करून वर्षभर कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी शेतकरी शेतात जीव वे पणाला लावून राबतो.मात्र,मागील हंगामापासून शेतकऱ्यांपुढे मोठे आवाहनच उभे झाले.कोरोना लॉकडाऊन काळात मजूरांची वानवा त्यातही अपेक्षित असा पाऊस झाला नसल्याने उत्पादनात घट या सर्व विवंचनेतून शेतकरी उठण्याच्या प्रयत्नात असतांना आता सुलतानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले. एकीकडे ऐन तोंडावर येऊन ठेपलेल्या मार्च एंडिंगच्या तडाख्यात बँकांकडून शेतकऱ्यांनी उचल केलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावला जात असताना दुसरीकडे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना घरगुती व कृषिपंपाचे वीज बिल तत्काळ भरा; अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यासंबंधाने बजावले जात आहे.अशा आर्थिक अडचणीच्या प्रसंगी शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करायची? की आवाक्याबाहेरचे घरगुती व कृषिपंपाचे वीज बिल भरायचे? की वर्षभर कुटुंबाचे गुजराण करायचे? असा मोठे केविलवाणा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा येऊन ठाकला आहे.