उद्रेक न्युज वृत्त
भुवनेश्वर: ओदिशामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.घरात बेडूक शिरल्यानं वैतागलेल्या एका आदिवासी व्यक्तीने चक्रावून टाकणारा प्रकार केला. आदिवासी व्यक्तीने बेडकाला पकडून त्याचे तुकडे केले.त्याची भाजी करून ती कुटुंबाला खाऊ घातली. त्यानंतर आदिवासी व्यक्ती झोपायला गेला.बेडकाची भाजी खाल्ल्याने मुलांची प्रकृती बिघडली आणि एकाचा मृत्यू झाला.तर दुसऱ्या मुलाची प्रकृती गंभीर आहे.त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बेडकाची भाजी खाल्ल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव सुमित्रा मुंडा आहे.ती सहा वर्षांची होती. क्योंझर जिल्हा मुख्यालयात शुक्रवारी रात्री तिने अखेरचा श्वास घेतला.तर सुमित्राचा ४ वर्षांचा भाऊ मुनीची प्रकृती गंभीर आहे.क्योंझर जिल्ह्यातील जोडा ब्लॉकमध्ये ही घटना घडली.सध्या परिसराच याच घटनेची चर्चा आहे.
बेडकाचे तुकडे करून त्याची भाजी करणाऱ्या मुना मुंडालाच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. वडिलांनी बेडकाची भाजी खाल्ली.मात्र त्यांना काहीच झाले नाही.मात्र मुलांची प्रकृती बिघडली.मुलांना नेमके काय झाले ते डॉक्टरांना समजत नव्हते. अखेर वडिलांनी झालेला प्रकार कथन केला.तो ऐकून डॉक्टरांना धक्काच बसला.
डॉक्टरांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.यानंतर पोलिसांनी क्योंझरपासून ७० किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या गुरुदा गावात जाऊन मुना मुंडाला (४०) अटक केली.पोलिसांनी मुनाकडे झालेल्या प्रकाराची चौकशी केली.’एक बेडूक सतत घरात शिरायचा. त्यामुळे मी वैतागलो होतो.गुरुवारी संध्याकाळी मी त्या बेडकाला पकडले.त्याचे लहान लहान तुकडे केले आणि मटण करतात त्याप्रमाणे त्याला मसाला टाकून शिजवले,’ असा घटनाक्रम मुनाने सांगितला.
मुनाने बेडकाची भाजी खाल्ली.त्याच्यासोबत त्याची दोन मुलेदेखील जेवली.त्यानंतर रात्री उशिरा मुलांना उलट्या झाल्या.ती बेशुद्ध होऊन पडली.शुक्रवारी त्यांना क्योंझर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे शुक्रवारी रात्री सुमित्राचा मृत्यू झाला.तर त्याचा मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे.या प्रकरणी बामेबाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.