उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.जिल्ह्यातील देसाईगंज आणि गडचिरोली वनविभागात वाघांनी पाळीव जनावरांसह अनेक नागरिकांचा बळी घेतला आहे.हल्ल्यांमध्ये सीटी-1 आणि टी-६ वाघ-वाघिणीने सर्वाधिक हल्ले केल्याचे समोर आले आहे.वनविभागाद्वारे दोन्ही वाघांना पकडण्याची मोहीम हाती घेण्या आली होती.दरम्यान १३ ऑक्टोबर २०२२ ला वडसा वनपरिक्षेत्रात सीटी -१ वाघाला जेरबंद करण्यात आले होते.तब्बल तीन महिन्यानंतर या वाघाला पकडण्यात वनविभागाला यश आले होते.
मात्र १० जणांचा बळी घेणाऱ्या ‘टी-६’ वाघिणीला तिच्या दोन बछड्यांसह सुरक्षितपणे पकडण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून वनकर्मचाऱ्यांचे पथक पोर्ला आणि चातगाव वनपरिक्षेत्रांतर्गत सतत शोध घेत आहेत.नरभक्षक टी-६ वाघिण वनकर्मचाऱ्यांच्या नजरेपासून दूरच असल्याचे दिसून येत आहे.तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाकडून सुमारे ८० ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले आहेत.मात्र गेल्या काही दिवसांपासून लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्येही वाघिण नजरेस पडत नसल्याने तिला पकडण्याचे मोठे आव्हान वनकर्मचाऱ्यांसमोर उभे आहे.