उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्याच्या आदिवासी ग्रामीण भागात कंत्राटदारांच्या वतीने झकास ऐवजी भकास बांधकामे करून दरवर्षी बांधकामांच्या नावाने शासनास कोट्यवधी रुपयांना चुना लावल्या जात आहे.अशातच ज्यांच्या नावाने कामे येतात त्यांची वांदी तर कंत्राटदारांची चांदी होत असल्याचे खरे वास्तव चित्र नजरेसमोर दिसून येत आहे.
गडचिरोली जिल्हा बहुल,नक्षलग्रस्त,मागासलेला व आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.जिल्ह्यातील कित्येक तालुक्यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात आदिवासी बांधव छोट्या-मोठ्या वस्त्या तयार करून वास्तव्यास आहेत.बरीचशी गावे जंगलव्याप्त असून मधोमध गाव व चौफेर घनदाट जंगल तरीही कसे-बसे उदरनिर्वाह करून संसाराचा गाडा हाकण्यात आदिवासी बांधव मग्न असतात.
जिल्ह्याच्या विकासाकरिता व आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने सोयीसुविधांसाठी शासन स्तरावरून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये दिली जातात.जसे,डांबरीकरण रस्ते,पांदण रस्ते,मोरी बांधकाम,सिमेंट-काँक्रीट रस्ते,अंगणवाडी बांधकामे,रुग्णालय बांधकामे,सिमेंट बंधारे बांधकामे,नाली बांधकामे व इतर शासकीय सार्वजनिक बांधकामे यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जातो.सध्याच्या घडीला जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये कामे सुरू करण्यात आली आहेत.मात्र बांधकामांचा दर्जा झकास न होता भकास होत असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे.बांधकामे भकास होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी अंगाला हळद लावून घेत नसल्याने व कामावर पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नसल्याने जसे चालत आहे तसे चालू द्या आमच्या बापाचा काय जातो अशी मनधरणी झाली आहे.
आदिवासी ग्रामीण भागात कामे सुरू असतांना एकही अधिकारी वा कर्मचारी बांधकामांवर देखरेख वा काम कसे केल्या जात आहे; याकडे लक्ष देत नसल्याने शासनाचा महसूलही बुडीस लागला आहे.कित्येक कामांवर विना वाहतूक परवाना गौण खनिज वापरून अशातच कुठून तरी वाहतूक परवान्याची जुळवाजुळव करून देयके काढली जात आहेत.जंगलातीलच गौण खनिजांचा अनेक कामांवर वापर केला जातो आहे.पाहिजे त्या प्रमाणात योग्य व उत्कृष्ट कामाचा दर्जा कुठेच पहावयास मिळत नाही.जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा जेव्हा भेटी वा दौरा कार्यक्रम असतो त्यावेळेस काम योग्य असल्याचे भासविले जात आहे.जिल्ह्याच्या भामरागड तालुक्याबरोबरच एटापल्ली, सिरोंचा,अहेरी,मूलचेरा,धानोरा,कोरची व इतर तालुक्यात पूर्णपणे भकास कामे करून कंत्राटदारांची घरे भरली जात आहेत.कुठेतरी यावर आळा घातला पाहिजे.यासाठी कितीही आतमध्ये काम असो अधिकारी,कर्मचाऱ्यांनी आपली महत्वाची भूमिका बजावणे आवश्यक आहे.काम योग्य,उत्कृष्ट व उत्तमप्रकारे होण्याकडे सर्वांनी लक्ष द्यावे.अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.