उद्रेक न्युज वृत्त
नाशिक :- ग्रामीण भागासह शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे फर्मान पाेलिस आयुक्त व ग्रामीण अधीक्षकांनी काढलेले असतानाही ऑनलाईन चालणारा राेलेट नावाचा जुगार सर्रास सुरू आहे.या जुगारात लाखाे रूपये हारल्याने कर्जबाजारी झालेल्या युवकाने घरातील बांधकामासाठी ठेवलेली सात लाख रूपयांची रक्कम घेऊन पाेबारा केला आहे. याबाबत त्याच्या वडीलांनी माहिती पडताच आज बुधवारी (१ फेब्रुवारी)रोजी पाेलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षकांसह शहर पाेलिस आयुक्तांनी अवैध धंदे समुळ नष्ट करण्याचे फर्मान काढले आहे.मात्र या धंद्यांवर काही प्रमाणातच चाप बसविण्यात यंत्रणेला यश आले आहे.शहरातील पंचवटी व भद्रकाली पाेलिस ठाण्याच्या हद्दीत अजूनही छुप्या पध्दीतीने जुगार,मटका यासारखे अवैध धंदे सुरू आहेत. ऑनलाइन पध्दतीने चालविला जाणारा राेलेटचा धंद्या सध्या जाेमात आहे.या पैशाच्या आमिषा पाेटी युवा पिढी अवैध धंद्याकडे ओढली जात आहे. गंभीर बाब म्हणजे अनेक सुशिक्षित तरूण यात बळी पडत असल्याने त्यांचे आयुष्य उध्वस्त हाेत आहे.गुन्हेगारांचे आश्रयस्थान आणि गुन्हे घडण्यासाठी प्रवृत्त करणारा हा रोलेट गेम शहर व ग्रामीण पोलिसांच्या नाकावर टिचून सर्रास सुरु आहे.वाढलेले कर्ज आणि त्याच्या परतफेडीसाठी गुन्हेगारी कृत्य केले जात असून नैराश्यातून आत्महत्या केल्याचेही अनेक उदाहरणे आहेत. रोलेटचा कॅन्सर नाशिकमध्ये आपले प्रस्थ घट्ट करीत आहे. शहरातील बड्या हॉटेल्स, रस्त्यावरील चहा व पान टपरी, रहीवाशी इमारतीतील फ्लॅट मधून राेलेटचा धंदे सुरू आहेत. स्थानिक पाेलिस मात्र साेयीने याकडे दुर्लक्ष करत आहेत.
सातपूर मधील वामन महादू सरोदे यांचा मुलगा सोमनाथ सरोदे हा रोलेट गेमच्या आहारी गेला होता. रोलटमुळे त्याच्यावर लाखाे रूपयांचे कर्ज झाल्यामुळे त्याने घरातील बांधकामासाठी जमवलेली ७ लाख रुपयाची रक्कम घेऊन बेपत्ता झाला. यासंदर्भात सातपूर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारही देण्यात आली. मात्र सातपूर पोलिसांकडून काेणत्याही प्रकारची हालचाल हाेत नसल्यामुळे वामन सराेदे यांनी आज पाेलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.