उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- शाळा, महाविद्यालय परिसरात अल्पवयीन असलेल्या मुला- मुलींकडून सुसाट वेगाने वाहने चालविली जातात. काही ठरावीक रस्त्यावर हे प्रकार सर्वाधिक दिसून येतात. विशेषतः शाळा, महाविद्यालयाजवळ अल्पवयीन मुले वाहन चालवित असल्याचे दिसते. खासगी शिकवणी वर्ग, शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात ही अल्पवयीन मुले वाहन चालविताना अधिक प्रमाणात दिसतात.
शालेय तसेच अकरावी, बारावी प्रवेशित विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पालकांकडून वाहन चालविण्याचा परवाना मिळण्याआधी वाहन दिले जात असल्याचे प्रकार जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागातही पाहावयास मिळतात. अल्पवयीन मुलाने वाहन चालविताना पोलिसांनी पकडल्यास वाहन मालकाला पाच हजारांचा दंड आणि तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. याची अनेकांना कल्पना नसते. मात्र, ओठावर मिशा फुटण्याआधीच वाहन चालविल्याने अपघात घडल्यास निष्पापांचा बळीसुद्धा जाऊ शकतो.त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.