उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी :- तालुक्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्हेर नवरगाव ते ब्रह्मपुरी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.एखादा भीषण अपघात होतो आणि प्रशासनाला जाग येते.तात्पुरते खड्डे बुजविण्याचे काम शासकीय अधिकारी ठेकेदाराच्या माध्यमातून करतात.थातूरमातूर काम केले जाते; परंतु रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
अर्हेर-नवरगाव ते ब्रह्मपुरी मार्ग परिसरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे.त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची गर्दी दिसून येते.मागील काही वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे; परंतु दरवर्षी रस्त्याची केवळ डागडुजी केली जाते.त्यामुळे दरवर्षीच रस्त्यावर खड्डे दिसून येतात.रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम तात्पुरत्या स्वरूपात मार्च एंडिंग’च्या खर्च तरतुदीनुसार फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले; परंतु काही ठिकाणी फक्त मध्यम स्वरूपाची गिट्टी टाकून थातूरमातूर काम केले आहे.दरवर्षी अशी तात्पुरती डागडुजी करण्यापेक्षा सिमेंट काँक्रिटचे पक्के बांधकाम करावे; अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.