उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- राज्यात मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.या योजनेसाठी घरातील अनेक कर्ते पुरुष व युवक दाखले,कागदपत्र गोळा करण्यासाठी धावपळ करीत आहेत.त्यातच तालुक्यातील नवेगावबांध ग्रामपंचायत कार्यालयात जन्माचा दाखला मागण्यासाठी गेलेल्या युवकाच्या कानशिलात महिला सरपंचाने हाणल्याची घटना गुरुवारी ४ जुलै ला घडली.मारहाण करणाऱ्या नवेगावबांध ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाचे नाव हिराबाई नीलमचंद पंधरे (रा.खोली नवेगावबांध) असे आहे. आशिष सुभाष लंजे वय २० वर्षे हा युवक नवेगावबांधच्या सरपंच हिरा पंधरे यांच्याकडे गुरुवारी दि.४ जुलै ला दाखला मागण्यासाठी गेला होता. दरम्यान पैश्यांचा हिशोब न दिल्याचे कारण पुढे करुन सरपंच हिराबाई पंधरे यांनी युवकाच्या कानशिलात हाणली. युवक आशीष लंजे हा नवेगावबांध येथील रहिवासी असून; ग्रामपंचायत नवेगावबांध येथील ग्रामपंचायत वन समितीच्या वतीने राष्ट्रीय उद्यानाच्या हिलटॉप गार्डन वर काम पाहत होता.येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश पास देऊन पैसे गोळा करण्याचे कार्य करत होता.काही दिवसाआधी त्याला कामावरून काढण्यात आले होते.सरपंच हिराबाई पंधरे यांनी आशिष लंजे याला पैशाचा हिशेब न दिल्यामुळे कानशिलात लगावल्याचे पोलिस ठाण्यात कबूल केले.युवकाने सरपंच हिराबाई पंधरे यांच्या विरोधात नवेगावबांध पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

