उद्रेक न्युज वृत्त
नंदुरबार :- माहिती अधिकार अधिनयम २००५ अन्वये प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणांना माहिती अधिकारात मागितलेली माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.त्यानुसार काही कार्यालये माहिती देतात तर काही कार्यालयातर्फे माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते.मात्र माहिती देऊनही व्यक्तीच सापडत नसेल तर त्यास काय म्हणावे? असाच एक अनोखा व आगळा-वेगळा प्रकार नंदुरबार जिल्ह्यात हल्ली उघडकीस आला आहे.ज्याने पत्त्यानिशी माहिती अधिकारात माहिती मागितली; अशा व्यक्तीचा शोध घेऊनही सापडत नसल्याने अखेर नाईलाजास्तव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की,माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये सलीम सुलेमान बागवान राहणार – बागवान गल्ली,नंदुरबार इसमाच्या नावाने जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयास ६ जून २०२३ रोजी माहिती अधिकार अर्जाद्वारे मागितली होती.त्यानुसार पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या पत्त्यावर माहिती पाठविली असता पोस्ट विभागाकडून १२ जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयास कळविण्यात आले की,बागवान गल्ली,नंदुरबार या ठिकाणी सलीम सुलेमान बागवान नावाचा कुठलाही इसम वास्तव्यास राहत नसल्याचे सांगितल्या गेले.त्यानुसार पोलीस पथकाने शहानिशा करण्यासाठी गुपितरित्या माहिती काढली असता; सर्व प्रकार उघडकीस आला.सदर नावाचा कुठलाही व्यक्ती नसून नाहक पोलीस प्रशासनास त्रास देण्याचा कुणाचा तरी मानस असावा व पोस्ट विभागाकडूनही तसा अहवाल प्राप्त झाल्याने पोलीस प्रशासनातर्फे अज्ञात व्यक्ती विरोधात १८ जुलै २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनास नाहक त्रास देणाऱ्याचा लवकरच शोध घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी म्हटले आहे.