- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्यात महायुतीने विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारून विरोधकांची बोलती बंद केली आहे.मात्र,महाराष्ट्र राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण? याचा पेच निर्माण झाला असतांना अखेर यावर मोहर उमटली असल्याचे दिसून येते.यापूर्वीच म्हणजेच उद्या ५ डिसेंबरला मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे.अशातच आज देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.त्यामुळे तेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट झाले आहे.त्यांनी आज बुधवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासोबत राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला.त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्याचे औपचारिक निमंत्रण दिले.यावेळी भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी व निर्मला सीतारामनही हजर होत्या.
त्यानंतर फडणवीस,शिंदे व पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.त्यात फडणवीस व शिंदे या दोघांनीही सांगितले की,कोण व कितीजण शपथ घेतील याची माहिती लवकरच दिली जाईल.शपथविधी सोहळा उद्या गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर होईल.या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही उपस्थिती असेल.राजभवनात महायुतीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शिवसेनेच्या आमदारांसोबत शिंदेंनी बैठक घेतली. तसेच देवेंद्र फडणवीस देखील दाखल झाले होते.शिंदे व फडणवीस यांच्यात जवळपास पाऊण तास चर्चा झाली आहे.आता शिंदे यांच्या भूमिकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदे आणि पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का? असा प्रश्न पत्रकारांनी केला होता.यावर अजित पवार म्हणाले,कोणी घेत आहे की नाही हा वेगळा विषय आहे.या लोकांबाबत संध्याकाळपर्यंत निर्णय होईल,पण मी उद्या शपथ घेणार हे निश्चित आहे. त्यावर शिंदे म्हणाले की,अजितदादांना पहाटे व संध्याकाळी शपथ घेण्याचा अनुभव आहे.
- Advertisement -