उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी आज सोमवारपासून अंगणवाडी सेविका,मदतनिसांनी बेमुदत संप सुरु केला आहे.त्यामुळे अंगणवाड्यांमधून दररोज वितरित केला जाणारा चिमुकल्यांचा पोषण आहार अडकला असून,त्यांचे शिक्षण व खेळणेही थांबले आहे.अचानक ओढवलेल्या या संकटामुळे जिल्ह्यातील प्रशासन अडचणीत आले असून त्यांना पर्यायी व्यवस्था उभी करता आली नाही.त्यामुळे आज २० फेब्रुवारी २०२३ रोजी दिवसभरात जिल्ह्यातील एकही अंगणवाडी उघडू शकली नाही.देशाचे भविष्य सामोरे नेण्याकडे म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते; त्यांना घडविण्याच्या प्रक्रियेतील हा पहिला घटक आहे.त्यामुळे शासनाने वेळोवेळी या घटकाचा गौरवपूर्ण उल्लेख करीत त्यांना मानधनवाढ व इतर बाबी लागू करण्याची आश्वासने दिली.प्रत्यक्षात मात्र त्या आश्वासनांवर अंमल केला नाही.त्यामुळे आक्रमक झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी आजपासून काम बंद आंदोलन करीत संप पुकारला आहे.