उद्रेक न्युज वृत्त
अहेरी(गडचिरोली) :- गडचिरोलीजिल्ह्याच्याअहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे मध्यरात्री बाहेर खाटेवर गाढ झोपेत असलेल्या चरणदास गजानन चांदेकर वय ४८ वर्षे,रा.छल्लेवाडा,ता.अहेरी यांच्या अंगावर अज्ञात इसमाने पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना आज २ जून रोजी उघडकीस आली आहे.
सध्याच्या घडीला उकाड्याचे दिवस सुरू आहेत. दिवसा तसेच रात्री उष्णतेने अंगाची लाहीलाही होत आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील अनेकजण घरामध्ये उष्णता वाटत असल्याने बाहेर अंगणात खाट टाकून झोपत असतात.मात्र, एखादेवेळेस अनुचित प्रकार घडेल याची साधी कल्पनाही अनेकांना नसते.असाच प्रकार चरणदास यांच्या बाबतीत घडलेला दिसून येत आहे.सायंकाळच्या सुमारास घरातील कुटुंबीय व चरणदास सर्वांनी मिळून जेवण करून उकाड्यामुळे बाहेर अंगणात खाट टाकून झोपी गेले होते.सर्वजण गाढ झोपेत असतांना मध्यरात्री अज्ञात इसमाने चरणदास चांदेकर यांच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावून पळून गेला.चरणदास आगीने होरपळू लागल्याने किंकाळ्या मारू लागला.जवळच झोपलेल्या कुटुंबीयांना जाग आली.तोच कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न लावता आग विझवली.मात्र, चरणदास हे जळाल्याने गंभीर जखमी झाले.परिसरात विचित्र घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणारा ‘तो’ अज्ञात इसम कोण? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

