उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- नक्षल्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य नांगसू तुमरेटी उर्फ गिरीधर याने पत्नी संगीतासह काल,शनिवारी दि.२२ जूनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षल्यांच्या पश्चिम सबझोजनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने एक पत्रक जारी केले आहे. श्रीनिवासने गिरीधरला ‘भगोडा’ म्हटले असून,त्याला जनता माफ करणार नाही; असा इशारा दिला आहे.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गिरीधरने पत्नीसह आत्मसमर्पण केले.यावेळी फडणवीस यांनी गिरीधर हा गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल चळवळीतील शेवटचा नेता होता.त्याच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीचे कंबरडे मोडल्याचे म्हटले होते.यासंदर्भात नक्षल्यांचा प्रवक्ता श्रीनिवासने एक पत्रक जारी केले आहे.
श्रीनिवासने पत्रकात म्हटले आहे की,गिरीधर आणि त्याची पत्नी ४ जूनलाच माओवादी कम्युनिस्ट पक्षातून कुणालाही न सांगता पोलिसांकडे पळून गेले.गिरीधर मागील २८,तर संगीता ही २३ वर्षांपासून नक्षल चळवळीत कार्यरत होती.१९९६ मध्ये गिरीधर
नक्षल चळवळीत सहभागी झाल्यापासून वेगवेगळ्या पदांवर जाऊन त्याने दंडकारण्यातील उच्च पद प्राप्त केले.परंतु अलीकडे पोलिसांनी अनेक नक्षल नेत्यांना ठार केल्यानंतर माओवादी कम्युनिस्ट पक्षाला नानाविध अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे.या अडथळ्यांना समर्थपणे तोंड देण्याऐवजी गिरीधरने भयभीत होऊन पोलिसांपुढे शरणागती पत्करली, अशी टीकाही प्रवक्ता श्रीनिवास याने केली आहे.

