उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात,म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल,शुक्रवारी नागपूर जिल्ह्यातील तीन नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण केले.मात्र,नरखेड तालुक्यातील मोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याने कार्यालयीन वेळेत दारू ढोसल्याने मृत्यूशी झुंज देत असलेल्या महिलेला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत.या प्रकारामुळे मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे.डॉ.मयूर बोपचे यांच्याकडे या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कार्यभार असून,डॉ.प्रवीण उमरगेकर हे दुसरे वैद्यकीय अधिकारी आहेत.दोन्ही वैद्यकीय अधिकारी आपल्या सोयीनी तीन-तीन दिवस कर्तव्य बजावतात.शुक्रवारी डॉ.प्रवीण उमरगेकर यांची ड्युटी होती.सकाळी १०:३० च्या दरम्यान मोवाडच्या वॉर्ड नं.३ येथील एका २८ वर्षीय विवाहित महिलेने घरगुती वादावरून विष प्राशन केले.तिला सकाळी ११ वाजता दरम्यान मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता,तिथे एकही आरोग्य अधिकारी हजर नव्हता. कर्तव्यावर असलेले डॉ.प्रवीण उमरगेकर हे त्यांच्या शासकीय निवासस्थानी दारूच्या नशेत झिंगत पलंगावर पडले होते.प्रभारी डॉ.मयूर बोपचे हेही मुख्यालयी नव्हते.यानंतर संतप्त नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले.परंतु,डॉ.उमरगेकर हे त्यांच्या निवासस्थानी असल्यामुळे हतबलता दाखविली.हा प्रकार आरोग्य केंद्राचे प्रभारी डॉ.मयूर बोपचे यांना समजताच त्यांनी बेलोना येथे आश्रम शाळेतील कॅम्पमध्ये कार्यरत डॉ.प्रतीक राऊत यांना १२ वाजता मोवाड येथे जाण्याचे निर्देश दिले.१२:१५ च्या दरम्यान डॉ.प्रतीक राऊत यांनी मोवाड येथे दाखल होत महिलेवर उपचार केले.दरम्यान मोवाड येथे असलेला आपला दवाखान्यात गेले असता,तोही दवाखाना कुलूपबंद होता.काही दिवसांपूर्वी तेथे रुजू झालेल्या डॉ.पल्लवी पटले याही अनुपस्थित होत्या.त्या डॉ.मयूर बोपचे यांच्या पत्नी आहेत.डॉ.मयूर बोपचे सपत्नीक बाहेर गेल्याची माहिती मिळाली आहे.
दुपारी २ वाजता दरम्यान डॉ.प्रवीण उमरगेकर दारूचा प्रभाव कमी झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात आले असता, त्यांना नरखेड पोलिसांनी पोलिस वाहनातून नरखेड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीकरिता नेले.प्रकृती गंभीर असल्याने तिला तात्काळ नागपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. सदर प्रकार अतिशय निंदनीय असून कर्तव्यावर असताना दारू पिऊन झिंगणाऱ्या तसेच अनुपस्थित असलेल्या डॉक्टर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी; अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

