उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात अवैध सावकारी सुरू आहे.अनेक गोर गरीब बेकायदेशीर सावकारीद्वारे लुटल्या गेल्याचे समजते. अवैध सावकार शेतकरी,व्यापारी,लघु उद्योजक, शेतमजूर तसेच समाजातील विविध गरजू घटकांकडून अवास्तव दराने व्याज वसूल करतात.व्याज न दिल्यास मालमत्ता हडप करणे,दमदाटी करणे,उपद्रव,गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून धमकी,मारहाण आदी गैरप्रकार करतात.अशी व्याजबटी करणाऱ्या सावकारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सहाय्यक निबंधक विभागाने कंबर कसने आवश्यक आहे.राज्य शासनाचा महाराष्ट्र सावकारी अध्यादेश २०१४ सुधारित कायद्यांतर्गत अवैध सावकारी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येते.कोणताही अवैध सावकार,दलाल कुठल्याही प्रकारचा त्रास देत असल्यास सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येथे संपर्क साधून तक्रार दाखल करणे आवश्यक आहे.शिवाय ज्यांना कर्ज हवे असेल,त्यांनी विशेषतः शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँका,सहकारी संस्था,परवानाधारक सावकार यांच्याकडून व व्याज दर निश्चित करूनच कर्ज मागणी करून घ्यावी.

