उद्रेक न्युज वृत्त
अहेरी(गडचिरोली) :- तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी पहाटे जंगलात गेलेल्या महिलेवर रान डूकराने हल्ला केला असल्याची घटना आज दिनांक- ११ मे रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.रान डूकराने हल्ला केलेल्या महिलेचे नाव अंजली राजेश्वर रामटेके असून शहरातील प्रभाग क्र. १६ चेरपल्ली येथील रहिवासी आहेत.सदर महिला गंभीर जखमी झाल्याने तिला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्हा जंगल व्याप्त असून हल्ली तेंदुपत्ता तोडण्याचे काम सर्वत्र सुरू झाले आहे.तेंदु पत्त्याच्या माध्यमातून अनेकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत असतो.अशातच जंगलात मोठ्या प्रमाणावर हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढल्याने अनेकजण हल्ल्यात गंभीर जखमी वा ठार होतांना दिसून येतात.असाच प्रकार आज सकाळच्या सुमारास घडून आला असल्याने तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.एखादे वेळी जंगलात अनुचित प्रकार घडल्यास यांस जबाबदार कोण? असा सवाल अनेकांकडून उपस्थित होऊ लागला आहे.

